पेणमध्ये यत्री लॉजवर PITA कायद्यान्वये छापा


दोन पुरुष एजंट अटकेत; पीडित महिलेची सुटका

पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पेण (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध मानवी व्यापाराविरोधात पोलिसांनी कारवाई करत यत्री लॉजवर छापा टाकला. या कारवाईत दोन पुरुष एजंटना अटक करण्यात आली असून, एका पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पेण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार यत्री लॉज येथे अनैतिक व्यापार सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. या कारवाईदरम्यान दोन पुरुष एजंट पोलिसांच्या हाती लागले. तसेच अनैतिक व्यापाराच्या जाळ्यात अडकलेल्या एका महिलेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नलकुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती पळवे आणि त्यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(२), ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA Act) कलम ३, ४, ५ आणि ७(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित एजंटांकडे या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

पेण परिसरात अनैतिक व्यापार आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर प्रकारांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अशा प्रकारचे जाळे अन्य ठिकाणी कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.