अलिबाग सिव्हिलमध्ये MRI सुविधा द्या; बंद CT Scan तातडीने सुरू करा


मनसे तालुकाध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MRI मशीनची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासह बंद असलेली CT Scan मशीन त्वरित दुरुस्त करून कार्यान्वित करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुकाध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल हे महत्त्वाचे शासकीय रुग्णालय आहे. मात्र, रुग्णालयात MRI मशीनची सुविधा उपलब्ध नसल्याने गंभीर आजार, अपघात तसेच मेंदू, मणका आणि इतर महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्यांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचे म्हात्रे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
गंभीर रुग्णांच्या बाबतीत वेळेत तपासणी होणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, MRI तपासणीसाठी बाहेर जावे लागत असल्याने उपचाराला विलंब होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्येच अत्याधुनिक MRI सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच रुग्णालयातील CT Scan मशीन बंद असल्यास ती तातडीने दुरुस्त करून सुरू करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. CT Scan आणि MRI सुविधांसाठी आवश्यक तांत्रिक कर्मचारी तसेच वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि त्यासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
शासकीय दरात तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्यास रायगड जिल्ह्यातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी सिद्धू म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनाच्या प्रती जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड, आरोग्य सेवा संचालक, महाराष्ट्र राज्य तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.

यावेळी मनसेचे अलिबाग तालुकाध्यक्ष सिद्धू म्हात्रे, तालुका सचिव विनायक पालेकर, मुरलीधर पाटील, स्वप्नील पाटील, सुमित म्हात्रे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.