अलिबाग (प्रतिनिधी): शेतकरी कामगार पक्ष हा आक्रमक पक्ष असून त्याने अनेक यशस्वी आंदोलने केली आहेत. याच पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आंदोलनकर्त्यांना पाठींबा देण्यासाठी पुण्यात आल्या आहेत. वेळ पडली तर लाखो कार्यकर्ते घेऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहण्याची ताकद शेकापमध्ये आहे, असे गौरवोद्गार रोहित पवार यांनी काढले. एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन पुण्यात सुरू असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील बुधवारी (दि. 7) सायंकाळी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यावेळी रोहित पवार बोलत होते.
यावेळी शेकापच्या विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख साम्या कोरडे शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे लढवय्ये नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली चित्रलेखा पाटील पक्षाचे काम करीत आहेत. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या पुण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडली तर शेकापचे लाखो कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. पारदर्शक प्रशासनाच्या मागणीसाठी त्यांचा सत्याग्रह सुरू आहे. मात्र, अद्याप सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही, अशी भूमिका पवार यांनी मांडली. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावण्याऐवजी सरकारने आंदोलनस्थळीच येऊन त्यांच्याशी चर्चा करावी. सरकारने याच ठिकाणी निर्णय घ्यावा. अन्याय झाला तर गप्प बसणार नाही. आता आवाज वाढवण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढणार, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
विद्यार्थ्यांसाठी ढाल बनू चित्रलेखा पाटील यांची ग्वाही
शेतकरी कामगार पक्षाने कायमच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या न्यायासाठी संघर्ष केला आहे. अन्यायाविरोधात लाल बावटा घेऊन शेकाप कायम रस्त्यावर उतरला आहे. एमपीएससीच्या बारा लाख विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी कामगार पक्ष ढाल बनून उभा राहील. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत सरकारला जाब विचारत राहू, असा निर्धार शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
पुण्यात एस. एम. जोशी पुलाजवळ एमपीएससी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी चित्रलेखा पाटील आंदोलनस्थळी गेल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. शेतकरी कामगार पक्षाचा एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे. शेकाप विद्यार्थ्यांच्या सोबत कायम राहील. चळवळ क्रांती घडवू शकते. ही क्रांती अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.
रायगडसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा बुलंद आवाज असलेले जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाने अनेक संघर्ष उभे केले आहेत. खोतांविरोधातील लढा असो, सेझविरोधातील आंदोलन असो किंवा शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या हक्कांचा प्रश्न असो, शेकापने सातत्याने आवाज उठविला आहे. गोरगरीबांवर अन्याय झाला की शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. पुणे हा शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेला जिल्हा आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देण्यासाठी आपण पुण्यात आलो असल्याचे सांगत चित्रलेखा पाटील म्हणाल्या, रोहित पवार यांच्यासारखे नेते विद्यार्थ्यांच्या पाठीशी ढालीप्रमाणे उभे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खंबीरपणे हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवावा.
सरकारने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांचा संयम सरकारने आणखी तपासू नये, असा इशारा त्यांनी दिला. अन्याय आणि अत्याचार होत असताना आवाज उठविणे हा विद्यार्थ्यांसह आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. हा हक्क मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही. चळवळीमध्ये प्रचंड ताकद असते. जनता रस्त्यावर उतरली की सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांना आपल्या खुर्च्या जाण्याची भीती निर्माण होते आणि तेव्हाच त्यांना जनतेचे महत्त्व कळते, असेही चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
कार्पोरेट खोतांविरोधातही संघर्षाची हाक
नारायण नागू पाटील यांनी संघर्ष करून खोतांना घालविले. आता या कार्पोरेट खोतांना घालविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन चित्रलेखा पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नापासून शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्कांपर्यंतचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
घोषणांनी परिसर दणाणला
पारदर्शक कारभाराचा मुद्दा घेऊन एक वेगळी चीड ठेवून विद्यार्थी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात स्वयंस्फुर्तीने विद्यार्थी सहभागी झाले. पुणेसह वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी आंदोलनात सामील झाले. अध्यक्षांचा राजीनामा झाला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असो अशा अनेक घोषणा विद्यार्थ्यांनी केल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
प्रश्न विचारणे हा आमचा ट्रेेंड आहे- साम्या कोरडे
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी दबाव तंत्र वापरले जाणार आहे. भाजप प्रणित सरकारकडून हे काम केले जाणार आहे. स्कॉलरशीपसाठी यांच्याकडे निधी नाही. मात्र अन्य कामांवर उधळपट्टी चालू आहे. घोळ करणारे व पेपर फुटी करणारे अधिकाऱ्यांंचा राजीनामा झाला पाहिजे. प्रश्न विचारणे हा आमचा ट्रेंड आहे. तो विचारल्या शिवाय गप्प बसणार नाही. भीमानवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे ही आमची भुमिका आहे, असे प्रतिपादन शेकाप पुरोगामी विद्यार्थी संघटना प्रमुख साम्या कोरडे म्हणाल्या.









