हिरकणी कक्ष व जीवरक्षक कक्षाच्या कामाचा आढावा
मच्छीमार्केट व भाजी मार्केटच्या कामांनाही भेट
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग समुद्रकिनारी नव्याने उभारण्यात येत असलेल्या हिरकणी कक्ष तसेच जीवरक्षक कक्षाच्या कामाची वीज व बांधकाम सभापती प्रशांत मधुसूदन नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या.
अलिबाग समुद्रकिनारा हा स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे ठिकाण आहे. समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हिरकणी कक्ष आणि जीवरक्षक कक्ष उभारण्यात येत आहेत. या कामांची पाहणी करताना प्रशांत नाईक यांनी कामाची सद्यस्थिती, गुणवत्ता आणि पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा आढावा घेतला.
समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षिततेला विशेष महत्त्व असल्याने जीवरक्षक कक्षाचे काम नियोजनबद्ध आणि आवश्यक सुविधांसह पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. तसेच महिलांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या हिरकणी कक्षाच्या कामाचीही पाहणी करण्यात आली.
यानंतर प्रशांत नाईक यांनी अलिबाग येथील मच्छीमार्केट आणि भाजी मार्केटच्या सुरू असलेल्या कामांचीही पाहणी केली. या ठिकाणी नागरिक, व्यापारी आणि मच्छीमारांना भेडसावणाऱ्या समस्या, उपलब्ध सुविधा तसेच सुरू असलेल्या कामांची प्रगती याबाबत माहिती घेण्यात आली.
विकासकामे करताना नागरिकांच्या गरजा आणि सुविधांना प्राधान्य देऊन कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाहणीदरम्यान प्रशांत नाईक यांच्यासह त्यांचे सहकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.









