मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात रायगडची दमदार कामगिरी


खालापूर पंचायत समितीला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

रायगड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील खालापूर पंचायत समितीने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. नाशिक येथे रविवारी (११ ऑक्टोबर) आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, खालापूरचे गटविकास अधिकारी संदीप कराड तसेच चौक व वडवळ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या अभियानात रायगड जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये खालापूर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा समावेश होता. विकासकामांचे नियोजन, लोकसहभाग, स्वच्छता आणि अभियानाच्या निकषांनुसार प्रभावी अंमलबजावणी या बाबींमुळे खालापूर पंचायत समितीला हे यश मिळाले.

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी या यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. आगामी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० मध्ये ग्रामपंचायतींनी अधिक चांगली कामगिरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.