आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघात ताडवागळेत शिवसेनेचा जनसंपर्क कार्यालय; जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसैनिक तत्पर!


घटस्थापनेच्या मुहूर्तावर कार्यालयाचे उद्घाटन; आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघात संघटनवाढीवर भर

अलिबाग( प्रतिनिधी) : शिवसेना हा गोरगरीबांचा पक्ष आहे, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणीसाठी शिवसैनिक सदैव्य तप्तर असतात. ताडवागळे येथे सुरु झालेल्या जनसंपर्क कार्यालयात हक्काने येवून आपल्या समस्या मांडव्यात, असे आवाहन रायगड जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी केले आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेना ताडवागळे ग्रामपंचायत विभागीय कार्यालय तसेच ताडवागळे युवकांसाठी सुसज्ज व्यायाम शाळेचा उद्घाटन सोहळा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला, त्यावेळी राजाभाई बोलत होते.

अलिबाग तालुक्यातील आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच्या (शिंदे गट) संघटनात्मक हालचालींना वेग आला असून, परिसरातील युवक शिवसेनेच्या माध्यमातून संघटित होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच युवकांना व्यायामासाठी सुसज्ज सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने घटस्थापनेच्या मुहूर्तावर ताडवागळे येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय, ग्रामपंचायत विभागात आणि युवकांसाठी सुसज्ज व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये आपल्या समस्या मांडताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळावे, यासाठी राजकीय पक्षांच्या शाखा महत्त्वाची भूमिका बजावतात. याच पार्श्वभूमीवर ताडवागळे येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आल आहे. या कार्यालयातून परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा पाठपुरावा करण्यावर भर दिला जाणार आहे. शाखेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी नागरिकांना कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या, अडीअडचणी आणि स्थानिक प्रश्न कार्यालयात येऊन मांडावेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभाग प्रमुख स्वप्निल म्हात्रे संकेत पाटील व शिवसेनेचे शिवसैनिक २४ तास तत्पर राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांचा पाठपुरावा करणे, यासाठी कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते. नव्या शाखेच्या माध्यमातून नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्यातील संपर्क अधिक दृढ करण्याबरोबरच आंबेपूर जिल्हा परिषद मतदार संघात स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ताडवागळे येथील शिवसेना कार्यालय नागरिकांच्या प्रश्नांसाठी किती प्रभावीपणे कार्यरत राहते आणि स्थानिक समस्यांच्या पाठपुराव्यातून नागरिकांना कितपत दिलासा मिळतो, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
—
युवकांच्या संघटनावर भर
कुर्डुस विभागातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपली संघटनात्मक उपस्थिती वाढविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. परिसरातील युवक शिवसेनेच्या बॅनरखाली एकत्र येत असल्याने संघटनवाढीला चालना मिळत असल्याचे चित्र आहे. ताडवागळे येथील शाखेच्या उद्घाटनामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. नागरिकांशी नियमित संपर्क ठेवणे, त्यांच्या प्रश्नांची माहिती घेणे आणि स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, यावर आगामी काळात भर दिला जाण्याची अपेक्षा आहे.

युवकांसाठी व्यायामशाळेची सुविधा
ताडवागळे येथे युवकांसाठी सुसज्ज व्यायामशाळेचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले. आजच्या काळात युवकांमध्ये व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीविषयी जागरूकता वाढत असताना ग्रामीण भागातही त्यांना आवश्यक सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे. या व्यायामशाळेमुळे परिसरातील युवकांना व्यायामासाठी सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.