शेकाप शहर महिला आघाडीच्यावतीने
महाभोंडला उत्साहात; नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या हस्ते उद्घाटन, अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीने रंगत
अलिबाग (प्रतिनिधी): मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या संवादापासून काही काळ दूर जात, प्रत्यक्ष भेटीगाठी, हसण्या-खेळण्याचा आनंद आणि जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत अलिबागच्या महिलांनी एक दिवस अक्षरशः स्वतःसाठी जगला. निमित्त होते शेतकरी कामगार पक्ष अलिबाग शहर महिला आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाभोंडला आणि विविध स्पर्धांचे.
अलिबाग येथील स्वर्गीय नमिता नाईक क्रीडा संकुलात झालेल्या या कार्यक्रमाने पारंपरिक भोंडल्याला आधुनिक काळाशी जोडत महिलांना केवळ मनोरंजनाची संधी दिली नाही, तर घर-संसाराच्या जबाबदाऱ्यांमधून काही तास स्वतःसाठी काढण्याचा आनंदही दिला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या हस्ते झाले.
अलिबाग शहर महिला आघाडीच्या प्रमुख ॲड. नीलम हजारे आणि शहर महिला सहप्रमुख ॲड. अश्विनी ठोसर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. याप्रसंगी शेकापचे विविध महिला पदाधिकारी आणि नगरसेविका उपस्थित हाेत्या.
कार्यक्रमातील विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिलांनी आपल्या कलागुणांची आणि उत्स्फूर्त सहभागाची छाप पाडली. पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक आरती पाटील, द्वितीय विद्या पाटील आणि तृतीय कांचन असावा यांनी मिळवला. उखाणा स्पर्धेत भाग्यश्री प्रभू प्रथम, विनया देसाई द्वितीय आणि प्रमिला जोशी तृतीय ठरल्या. प्रश्नमंजुषेत कांचन आरसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. फुगडी स्पर्धेत पल्लवी ननवरे आणि निवेदिता वाघमारे यांनी सहभाग नोंदवत बक्षीस पटकावले. तळ्यात मळ्यात – प्रथम क्रमांक भारती पेरेकर द्वितीय क्रमांक वैजयंती धरणकर, बेस्ट परफॉर्मन्स प्रथम क्रमांक माया पटेल द्वितीय क्रमांक सुप्रिया पाटील तृतीय क्रमांक श्रेया पाटील लकी ड्रॉमध्ये अमृता पाटील प्रथम, नीलिमा वाणी द्वितीय, दिपाली पाटील तृतीय, प्रियांका कुळेकर चतुर्थ तर दिपाली वाघमारे पाचव्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
दिवसभर घर, मुलं, कुटुंब, नोकरी आणि विविध जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी हा कार्यक्रम म्हणजे जणू ‘माझ्यासाठीही वेळ हवा’ या भावनेचा उत्सव ठरला. मोबाईलच्या स्क्रीनवरून होणाऱ्या संवादापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्यात, हसण्यात आणि एकमेकींच्या आनंदात सहभागी होण्यात वेगळीच मजा असल्याचा अनुभव महिलांनी घेतला.
पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिला, उखाण्यांचा खुमासदार अंदाज, फुगडीचा ताल आणि विविध स्पर्धांमधील चुरस यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले होते. अनेक महिलांसाठी हा केवळ एक कार्यक्रम नव्हता; तर जुन्या मैत्रिणींना भेटण्याची, नव्या ओळखी निर्माण करण्याची आणि काही काळ मनमोकळेपणाने जगण्याची संधी होती.
उखाणा, पारंपरिक वेशभूषा, फुगडी, प्रश्नमंजुषा आणि लकी ड्रॉ अशा विविध उपक्रमांनी महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. मात्र या सगळ्यापेक्षा महत्त्वाचे ठरले ते म्हणजे महिलांनी काही तास स्वतःच्या आनंदासाठी दिलेला वेळ. म्हणूनच अलिबागचा हा महाभोंडला केवळ ‘नारीशक्तीचा जल्लोष’ नव्हता; तो होता घर-संसाराच्या धावपळीत स्वतःला विसरलेल्या महिलांनी स्वतःला पुन्हा भेटण्याचा एक दिवस. फेर भोंडल्याचा होता; पण त्यातून जुळल्या मैत्रीच्या गाठी. कार्यक्रम नवरात्रीचा होता; पण आनंद होता ‘स्वतःसाठी जगण्याचा’.









