अलिबाग (प्रतिनिधी): सेवा संकल्प अभियानांतर्गत स्त्री शक्ती संघटन आणि संवाद हा नावीन्यपूर्ण उपक्रम बुधवारी (ता.14) रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे व जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिकेत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी रायगड जिल्ह्यातील अभियानाच्या प्रगतीचा ऑनलाईन पद्धतीने आढावा घेण्यात आला. यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न्ती अभियानांतर्गत कार्यरत जिल्ह्यातील 14 तालुक्यातील एकूण 692 ग्रामपंचायतींमधील एकूण 912 ग्रामसखी, जिल्ह्यातून एकूण 16 हजार 579 महिला, जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांना बचतगटाच्या मध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमामध्ये एकूण 692 ग्रामपंचायतींमधील एकूण 912 ग्रामसखी, जिल्ह्यातून एकूण 16 हजार 579 महिला, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व कर्मचा-यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
महिलांशी संवाद साधताना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी, महिला बचत गटांची स्थापना, महिलांचे संघटन, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साध्य करण्याच्या संधी तसेच ग्रामीण विकास प्रक्रियेत महिलांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार निर्मिती आणि शाश्वत ग्रामीण विकासामध्ये महिला बचतगटांचे महत्त्व महिलांना पटवून दिले. प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी, स्वयंसहायता समूह स्थापना, लखपती दीदी, बँक खाते उघडणे, वैयक्तिक कर्ज, पीएमएफएफई, एसएचजी/व्हीओ/सीएलएफ/ट्रान्सॅक्टन/आयएफसी, एफपीओ व कर्ज वितरण बाबींचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेऊन निर्धारित वेळेत उद्दिष्टपूर्ती करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यासोबतच सेवा संकल्प अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काम करताना कोणत्या समस्या येतात त्या जाणून घेण्यात आल्या व त्यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पाणी व स्वछता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात स्वयं सहाय्यता गटांच्या योगदानाबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा व तालुकास्तरीय व्यवस्थापक तसेच प्रभाग समन्वयक यांनी कार्यशाळेचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
जिल्ह्यातील 692 ग्रामपंचायतींमधील महिला व ग्रामसखींचा सहभाग:
रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना बचतगटाच्या मध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सेवा संकल्प अभियानांतर्गत स्त्री शक्ती संघटन आणि संवाद हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील एकूण 692 ग्रामपंचायतींमधील एकूण 16 हजार 579 महिला, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व कर्मचा-यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.









