आडाचीवाडीच्या विकासाचे उदाहरण देत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी साधला संवाद
अलिबाग (प्रतिनिधी) : गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन काम केल्यास विरोध कमी होतो, कामे सुरळीत पार पडतात आणि गावाचा विकास साधता येतो, असे मत रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी व्यक्त केले.
अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. १५) शिर्के यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या मूळ गावातील विकासाचा प्रवास उलगडला.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या आडाचीवाडी या शिर्के यांच्या मूळ गावाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. याविषयी बोलताना शिर्के म्हणाले की, पूर्वी गावात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष होते. पाण्याअभावी कामानिमित्त शहरात स्थायिक झालेले अनेक ग्रामस्थ गावाकडे फिरकत नव्हते. मात्र, गेल्या १२ वर्षांत गावाचे चित्र बदलले आहे.
आज गावात पुरेसे पाणी उपलब्ध आहे. प्रत्येक कुटुंबाला दुग्धव्यवसायातून महिन्याला सुमारे ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. अंजिराचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यातूनही वर्षाला चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळू लागले. गावात सुसज्ज व्यायामशाळा आणि अभ्यासिका उभारण्यात आली आहे. पथदिवे तसेच विहिरींवरील पंपांसाठी सौरऊर्जेचा वापर केला जातो. गावातील प्रत्येक घर सौरऊर्जेने प्रकाशमान झाले. ग्रामस्थांच्या सहभागातून गावाने विकासाचा टप्पा गाठला आहे.
पारदर्शक कामातून विश्वास संपादन
कोणतेही काम करताना सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेतले जाते. चांगले काम करण्याची प्रामाणिक इच्छा असेल, तर दानशूर व्यक्तींकडूनही मदत मिळते. त्यासाठी गावात कुणीतरी पुढाकार घेऊन नेतृत्व करणे आवश्यक आहे. कामात पारदर्शकता असेल, तर लोकांचा विश्वास संपादन करता येतो. प्रत्येकजण प्रत्यक्ष कामात सहभागी होत नसला, तरी त्यांना विश्वासात घेऊन काम केल्यास सहकार्य मिळते आणि विकासकामे करणे सोपे होते, असे शिर्के यांनी सांगितले.
आडाचीवाडीतील काही तरुण गावाच्या विकासासाठी झोकून देऊन काम करत आहेत. ग्रामस्थांचा या तरुणांवर विश्वास असल्यानेच गावाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवता आला. योग्य नियोजन, पारदर्शकता आणि ग्रामस्थांचा सहभाग यांच्या बळावर प्रत्येक गावाचा विकास साधता येऊ शकतो, असा विश्वासही संदेश शिर्के यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आडाची वाडीचा आदर्श समोर ठेवला तर ही गावे समृद्ध होऊ शकतील असेही ते म्हणाले.
यावेळी अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी प्रास्ताविक केले. सचिव राजेश भोसतेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पवार यांनी केले.









