जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांशी चर्चा; नागरिकांमध्ये समाधानाची भावना
अलिबाग (प्रतिनिधी) : महाराजस्व अभियानांतर्गत महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी विविध समस्यांच्या निराकरणासाठी निवेदने सादर केली होती. या निवेदनांवर शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी आज अलिबाग येथील भाजप कार्यालयात संबंधित नागरिकांशी संवाद साधला.
नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर आतापर्यंत कोणती कार्यवाही झाली आहे, संबंधित विषयांची शासन स्तरावर काय स्थिती आहे आणि त्यांच्या निराकरणासाठी पुढे कोणती पावले उचलणे आवश्यक आहे, याबाबत ॲड. मोहिते यांनी नागरिकांकडून माहिती घेतली. नागरिकांच्या समस्या केवळ निवेदनापुरत्या मर्यादित न राहता त्यांचा प्रत्यक्ष पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी घेतली.
यानंतर ॲड. महेश मोहिते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन रायगडचे अपर जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांनी सादर केलेल्या निवेदनांमधील विषय, त्यावरील प्रलंबित कार्यवाही आणि समस्यांच्या सोडवणुकीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. संबंधित प्रश्नांचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याच्या दृष्टीने त्यांनी चर्चा केली.
महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली आहे. मात्र, या निवेदनांवर प्रत्यक्ष कार्यवाही होऊन नागरिकांना दिलासा मिळणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने निवेदनदार नागरिकांशी संवाद साधून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहणे आवश्यक आहे. या दिशेने ॲड. महेश मोहिते यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा क्षेत्रातील निवेदनदार नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, संबंधित प्रश्नांवर लवकरात लवकर कार्यवाही होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.









