अलिबाग मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा


अलिबाग (अमुलकुमार जैन): अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील मेडिकल कॉलेजच्या आवारात तीन विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल अविनाश राठोड (वय २३), वैभव पाटील (वय २४) आणि राज केसरवाणी (वय २४) यांना आरोपींनी कॉलेजच्या आवारात बोलावून घेतले. कॉलेजचे काम का सांगतो, या कारणावरून आरोपींनी तिघांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर त्यांना पकडून मारहाण करण्यात आली.

यावेळी एका आरोपीने हातातील कड्याने अतुलच्या नाकावर मारले. तसेच वैभव आणि राज यांच्या डोक्यावर मारहाण करून त्यांना जखमी केले.

या प्रकरणी सौउद खान, समिर शेख, शाहिद अन्सारी, फराज मिड, भुवन अलिमकर आणि अल शमी शेख यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे पुढील तपास करीत आहेत.