अलिबाग (प्रतिनिधी) : स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत अलिबाग नगरपरिषद आरोग्य विभागाला स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत श्रेडिंग मशीन प्राप्त झाले आहे. या मशीनच्या सहाय्याने नारळाच्या झावळ्या, करवंट्या तसेच झाडांच्या ओल्या व सुक्या फांद्या सहजपणे क्रश करून त्याचे व्यवस्थापन करता येणार आहे.
शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सेंद्रिय कचऱ्याचे प्रमाण मोठे असून, त्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी हे मशीन उपयुक्त ठरणार आहे. यामुळे कचरा संकलन आणि कचरा वर्गीकरण प्रक्रियेला अधिक गती मिळणार असून, कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करणे आता अधिक सोपे होणार आहे. परिणामी, पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळून शहर स्वच्छ व हरित ठेवण्यास मदत होईल.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांनाही कचरा वर्गीकरणाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून देण्यास नागरिकांनी सहकार्य केल्यास या योजनेचा अधिक प्रभावीपणे लाभ घेता येईल, असेही सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे ‘स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग’ या संकल्पनेला बळ मिळणार असून, शहराच्या स्वच्छतेत निश्चितच सकारात्मक बदल दिसून येणार आहे.
Home ताज्या बातम्या अलिबाग नगरपरिषदेला स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत श्रेडिंग मशीनची प्राप्ती; कचरा व्यवस्थापनाला गती






