बेकायदा एटीव्ही वाहनांवर कारवाईची मागणी; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह


अलिबाग (प्रतिनिधी): पर्यटनस्थळांवर वाढत चाललेल्या बेकायदा एटीव्ही (ऑल टेरेन व्हेईकल) वाहनांच्या धोकादायक वापराबाबत तीव्र चिंता व्यक्त करत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या या वाहनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असून, अनेक ठिकाणी अपघातांची शक्यता वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सावंत यांनी प्रशासनावरही सवाल उपस्थित करत संबंधित प्रांत अधिकारी व इतर यंत्रणांच्या निष्क्रियतेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने बेकायदा व्यवसायाला खतपाणी मिळत आहे,” असे ते म्हणाले.
तसेच, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्पष्ट, कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली लागू करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. एटीव्ही वाहनांसाठी परवाना प्रक्रिया, सुरक्षेची मानके, आणि निश्चित क्षेत्र यांसारख्या बाबींवर कठोर अंमलबजावणी व्हावी, असेही त्यांनी सुचवले.
पर्यटकांची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे नमूद करत, आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्षात कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.