पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्रात पुनर्बांधणी व समिती नियुक्तीवर महत्वपूर्ण बैठक


अलिबाग (प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्र पेढांबे येथे इमारत पुनर्बांधणी तसेच रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष व सदस्य नियुक्ती संदर्भात महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
बैठकीदरम्यान आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर भर देण्यात आला. तसेच रुग्णांच्या सोयी-सुविधा वाढवण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी अश्विनी सपकाळ, वैद्यकीय अधिकारी हेमा भोपाळे, वैद्यकीय अधिकारी संदीप रईस्वाल, सौ. शलाखा थळे तसेच इतर आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षपदी अमितदादा नाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे आरोग्य केंद्राच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.