नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याने महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही धडक कारवाई करत ४३ हजार रुपयांची लाच घेताना त्यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमण हटविण्याच्या कामाशी संबंधित बिल मंजूर करून देण्यासाठी गायकवाड यांनी संबंधित कंत्राटदाराकडे लाचेची मागणी केली होती. ऐरोली विभागात करण्यात आलेल्या कामांचे बिल मिळवण्यासाठी कंत्राटदाराने वारंवार पाठपुरावा केला असता, बिल मंजुरीसाठी ठराविक टक्केवारीची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात गायकवाड यांनी ४३ हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीयतेने पार पडली. संबंधित अधिकाऱ्याला कार्यालयातच अटक करण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे महापालिकेतील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच गायकवाड यांच्या मालमत्तेचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Home ताज्या बातम्या नवी मुंबई महापालिकेत खळबळ : अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांना लाच घेताना रंगेहात अटक




