राजिपच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डाॅ. रुपाली सातपुते


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डाॅ. रुपाली सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजिपचे तत्कालिन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांची पुणे येथे दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी राजिपच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे या प्रभारी म्हणून काम पाहात होत्या.
डाॅ. रुपाली सातपुते यांनी यापूर्वी पालघर जिल्ह्यातील कुपोषण नियंत्रण, तसेच विकसित भारत संकल्प यात्रा यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे पालघर येथे आयोजित कोकण सरस महोत्सवासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. आता त्यांची रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी (ता.22) रायगड जिल्हा परिषद येथे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्याकडून पदभार स्विकारला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जालिंदर पठारे यांनी त्यांचे स्वागत केले.