अलिबाग (प्रतिनिधी): सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या उमटे धरण संघर्ष समितीचे कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील यांना दैनिक महासागर वृत्तपत्राच्या वतीने ‘समाज रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना, हा पुरस्कार केवळ त्यांचा नसून संपूर्ण समाजाच्या लढ्याचा असल्याची भावना व्यक्त केली.
उमटे धरणातील गाळाचा प्रश्न सातत्याने प्रशासनापुढे मांडत, स्थानिक नागरिकांच्या हक्कासाठी लढा देत असलेल्या पाटील यांनी या यशाचे श्रेय पत्रकार, संपादक, सामाजिक संस्था तसेच विविध राजकीय नेत्यांना दिले. “अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधी आणि समाजातील विविध घटकांनी या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी साथ दिली. त्यांच्या पाठबळामुळेच आज हा सन्मान मिळू शकला,” असे त्यांनी सांगितले.
या पुरस्कारामुळे आपल्या कामाची दखल घेतली गेली असून, पुढील काळात अधिक जोमाने सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. “हा सन्मान मला नवी ऊर्जा देणारा आहे. यामुळे समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक वाढली असून, भविष्यातही जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत राहणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पाटील यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, उमटे धरणाच्या प्रश्नावर त्यांनी केलेल्या कामाची सर्वत्र दखल घेतली जात आहे.





