रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका राजा केणी यांनी केला आहे. अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विभागाच्या मुख्य अधिकारी निर्मला कुचिक यांच्यावर थेट आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली.
अंगणवाड्यांसाठी राबविण्यात आलेल्या सोलर पॅनेल आणि वीज जोडणी प्रकल्पात सुमारे अडीच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. सोलर पॅनेल बसविण्यात आले, मात्र त्यांची योग्य वीज जोडणी न करता कंत्राटदारांची बिले अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच अंगणवाडीतील खाऊ वाटप, मुलांचे गणवेश आणि गरोदर मातांसाठीच्या पोषण किट योजनांमध्ये कागदोपत्री शंभर टक्के वाटप दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात अत्यल्प लाभार्थ्यांपर्यंत साहित्य पोहोचत असल्याचा दावा केणी यांनी केला. निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मुलांना दिला जात असल्याने बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.
या प्रकरणातील संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रसिका राजा केणी सभापती, महिला व बालकल्याण विभाग, रा.जि.प. या गंभीर आरोपांमुळे रायगड जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, आता या प्रकरणावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोपी अधिकारी निर्मला कुचिक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





