अलिबाग समुद्रकिनारी अनोळखी महिलेचा मृतदेह; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज, पोलीस तपास सुरू


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग समुद्रकिनारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. संबंधित महिलेचा मृतदेह पाण्यातून वाहत किनाऱ्यावर आल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत अलिबाग पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्या चिठ्ठीवरून संबंधित महिलेने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्या चिठ्ठीवर “पी. जी. पाटील” अशी सही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मात्र, मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, तिचे वय, राहण्याचा पत्ता याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील नागरिक तसेच हरवलेल्या व्यक्तींबाबत माहिती असणाऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अलिबाग परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि अधिकृत माहितीसाठी प्रशासनाशी संपर्क ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.