रायगड (प्रतिनिधी) : लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांड प्रकरणात रायगड पोलीस ॲक्शन मोडवर आले असून मुख्य आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार याच्या शोधासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह विविध पोलीस ठाण्यांतील विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी तसेच राज्याबाहेरही शोधमोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकत असून पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. पोलीस यंत्रणा समन्वयाने काम करत असून आरोपीला अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले की, “या गुन्ह्याचा तपास अत्यंत गांभीर्याने केला जात असून आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल.” तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






