पावसाळ्यापूर्वी प्रशासन सतर्क : धोकादायक ठिकाणांची पाहणी, यंत्रणांना सज्जतेच्या सूचना


रायगड (प्रतिनिधी): येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना तातडीने सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी, दरडी कोसळणे, पूरस्थिती यांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने विविध विभागांना पूर्वतयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील अतिधोकादायक तसेच धोक्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्तीच्या वेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करता यावे यासाठी निवारा केंद्रांची सज्जता ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विभागाने आपला नियंत्रण कक्ष २४x७ कार्यान्वित ठेवून एक समन्वयक अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाला मोठी व मध्यम धरणांची सखोल तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, असे आदेश आहेत. अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेऊन धरणांमधून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) धोकादायक पुलांची तपासणी करून त्यांची दुरुस्ती तातडीने करावी, तसेच पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत, असे सांगण्यात आले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, साइडपट्टी दुरुस्त करणे, तसेच अपघातप्रवण ठिकाणी रिफ्लेक्टर्स आणि सूचना फलक बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा व लसी उपलब्ध ठेवाव्यात, तसेच आपत्तीच्या काळात साथीचे रोग पसरू नयेत यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आहेत.
याशिवाय, शोध व बचाव पथके सज्ज ठेवणे, आवश्यक यंत्रसामग्री जसे की जेसीबी, बोटी, लाईफ जॅकेट्स, स्पीड बोटी, जनरेटर आदींची उपलब्धता सुनिश्चित करणे, तसेच मनुष्यबळाची तयारी ठेवण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.