रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागात कथित अडीच कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप होत असताना महिला व बालकल्याण अधिकारी निर्मला कुचिक यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. विभागातील सर्व कामकाज शासनाच्या नियमांनुसार आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात आले असून कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार किंवा घोटाळा झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी यांनी विभागाच्या कामकाजाबाबत गंभीर आरोप केले होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कुचिक यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, विभागाकडून राबविण्यात आलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आली आहे. निधीचे वितरण, साहित्य खरेदी, लाभार्थ्यांची निवड आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया या सर्व बाबी नियमांचे पालन करूनच पार पाडण्यात आल्या आहेत.
“आमच्या विभागाने सर्व कामे ट्रान्सपरेंट पद्धतीने केली आहेत. प्रत्येक खर्चाची नोंद, मंजुरी आणि कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे घोटाळ्याचा आरोप निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही,” असे निर्मला कुचिक यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विभागाच्या कामकाजाची चौकशी कोणत्याही सक्षम यंत्रणेमार्फत झाली तरी सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला. महिला व बालकल्याण विभागाचे उद्दिष्ट महिला, बालक आणि गरजू घटकांच्या विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविणे हे असून त्या दृष्टीने विभाग सातत्याने कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेत राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर चर्चा रंगली असून आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Home ताज्या बातम्या रायगड महिला व बालकल्याण विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांवर निर्मला कुचिक यांचे स्पष्टीकरण;...






