जागतिक नृत्य दिनानिमित्त ‘नृत्यमय जगत’ कार्यक्रमाने अलिबागमध्ये रंगली कला-मेळा


अलिबाग (प्रतिनिधी): प्रचंड उत्साह, ऊर्जा आणि निसर्गाच्या सानिध्यात जागतिक नृत्य दिनानिमित्त नमन नृत्य संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “नृत्यमय जगत” या देखण्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. जगे गार्डन येथे जागतिक नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा रंगतदार नृत्यसोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शनी मोरे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री राहुल कदम, शिवसेना महिला आघाडी प्रमुख श्रीमती संजीवनी नाईक, उद्योजिका श्रीमती क्षमा नागवेकर तसेच नमन नृत्य संस्था, अलिबागचे संस्थापक व गुरु श्री अमोल कापसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गायत्री तुळपुळे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. त्यांच्या नेटक्या आणि प्रभावी निवेदनामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत प्राप्त झाली.
या नृत्यसोहळ्यात नमन नृत्य संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कथक नृत्याच्या विविध अंगांनी सादरीकरण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. लय, ताल आणि भाव यांचा सुंदर संगम अनुभवताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत कलाकारांचे कौतुक केले. संस्थेचे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
जागतिक नृत्य दिन साजरा करण्याचे हे संस्थेचे सातवे वर्ष असून, गेली २२ वर्षे संस्था कथक नृत्य प्रशिक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे करत आहे. ग्रामीण भागातही शास्त्रीय नृत्याची आवड जोपासत, त्यातून अर्थार्जनाच्या संधी निर्माण करणारे कलाकार घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था करत आहे.
मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांप्रमाणेच अलिबागमध्येही नृत्यकलेबद्दलची आवड वाढत असून, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळत आहे—ही बाब अभिमानास्पद असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
“ही संपूर्ण सृष्टी नृत्यमय आहे” — संगीत रत्नाकरमधील या विचाराची प्रचीती देणारी ‘नृत्यमय जगत’ ही संकल्पना कार्यक्रमातून साकार झाली. नृत्याच्या माध्यमातून जीवनातील आनंद, सौंदर्य आणि अभिव्यक्तीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाने दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी कलाकारांचे कौतुक करत, अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
सर्व उपस्थितांनी एकमेकांना जागतिक नृत्य दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा आनंद लुटला.