अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकीत शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली. या निवडणुकीत सहा ग्रामपंचायतीपैकी चार ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकला असून सरपंचसह सदस्यपदाच्या चार जागांवर शेकापचे उमेदवार निवडून आले. बुधवारी (दि.29) झालेल्या या मतमोजणीमध्ये शेकाप उमेदवारांना मतदारांनी विजयाचा कौल दिला. या विजयाचा जल्लोष शेकाप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच नागाव, वैजाळी, रेवदंडा, कोप्रोली आणि खंडाळे या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एक सदस्य अशा एकूण पाच सदस्यपदांच्या जागेसाठी पोट निवडणुकांचा कार्यक्रम घेण्यात आला. नवेदर नवगावच्या सरपंचपदासाठी शेकापच्या अंकिता जैतू यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्या सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत. रेवदंडा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या एक जागेसाठी शुभांगी कोंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.
नागाव, वैजाळी आणि खंडाळे ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी सदस्यपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नागावच्या सदस्यपदाच्या उमेदवार म्हणून मंजुषा राणे, वैजाळीच्या सदस्यपदाचे उमेदवार नंदकुमार पाटील, आणि खंडाळेच्या सदस्यपदाच्या उमेदवार समिक्षा गुरव हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मंगळवारी (दि.28) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान झाले. अलिबागमधील नागावमध्ये एक हजार 59 मतदारांपैकी 740, वैजाळीमध्ये एक हजार 112 पैकी 802 आणि खंडाळेमध्ये 972 पैकी 702 मतदारांनी मतदान केले.
बुधवारी(दि.29) सकाळी अलिबागमधील तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी करण्यात आली. सकाळी अकरानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली होती. नागाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी झालेल्या लढतीमध्ये शेकापच्या मंजुषा मंगेश राणे यांना 399 मते मिळाली. भाजपचे मंगेश आठवले यांना 229 मते मिळाली. मंगेश आठवले यांचा दारुण पराभव झाला असून शेकापच्या मंजुषा राणे या विजेत्या ठरल्या. वैजाळी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या निवडणूकीत शेकापचे सदस्य नंदकुमार पाटील यांना 411 मते मिळाली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार उमेश गावंड यांना 383 मते मिळाली. त्यामुळे नंदकुमार पाटील हे विजयी झाले. अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत नवेदर नवगाव, रेवदंडा, नागाव, वैजाळी या चार ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकला. कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, तर काही ठिकाणी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
चित्रलेखा पाटील यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव
नवेदर नवगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच व रेवदंडा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. नागाव व वैजाळी या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या जागेवर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बहुमतांनी निवडून आले. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. विजयी झाल्यानंतर नागावच्या नवनिर्वाचित सदस्या मंजुषा राणे, वैजाळीचे नवनिर्वाचित सदस्य नंदकुमार पाटील, खंडाळेच्या उमेदवार समिक्षा गुरव यांनी यांनी चित्रलेखा पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शेकाप माजी तालुका चिटणीस अनिल पाटील, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, विद्यमान सरपंच हर्षदा मयेकर,उपसरपंच मंगला नागे, निखील मयेकर, माजी उपसरपंच श्रीकांत आठवले, विना पिंपळे, सुरेंद्र नागलेकर, मंगेश राणे, चेतन नाईक, अभिषेक राणे, शुभम नाईक, यश नाईक, संतोष मोरे आदी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांंची भेट घेतली.






