बोडणी घाटात भीषण अपघात : ट्रेलर पलटी होऊन मजुरांच्या पिकअपवर कोसळला; एक ठार, आठ जखमी


श्रीवर्धन (प्रतिनिधी) : श्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाट परिसरात आज सकाळी भीषण अपघात घडला. आंबा तोडणीसाठी निघालेल्या मजुरांच्या पिकअप वाहनावर ट्रेलर पलटी झाल्याने एका मजुराचा मृत्यू झाला असून किमान आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव अजय भानुदास जाधव (वय २८, रा. गालसुरे) असे असून तो पिकअप वाहनातून इतर मजुरांसोबत आंबा तोडणीच्या कामासाठी जात होता. प्राथमिक माहितीनुसार, बोडणी घाटातील वळणदार रस्त्यावरून जात असताना ट्रेलरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर थेट पिकअप वाहनावर पलटी झाला. अपघाताचा जोर इतका भीषण होता की पिकअप वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. बचाव पथकानेही तातडीने मदतकार्य सुरू करत सर्व जखमींना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून ट्रेलर चालकाची चौकशी केली जात आहे.
घाट रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बोडणी घाटासारख्या धोकादायक वळणांवर अधिक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.