
अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी (ता.२) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये रायगड जिल्ह्याने आपली यशस्वी परंपरा कायम राखत मुंबई विभागात रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील ९३.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावी परिक्षेचा निकाल शनिवारी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. बारावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३० हजार ५५८ विद्यार्थ्यानी अर्ज भरले होते. त्यापैकी ३० हजार ४७० विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेला उपस्थित होते. यामधील २८ हजार ५४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा निकाल ९३.६९ टक्के लागला असून जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल ९७.११ टक्के श्रीवर्धन तालुक्याचा लागला असून, सर्वात कमी ८५.०२ टक्के निकाल खालापूर तालुक्याचा लागला आहे.
यामध्ये मुलींनी दरवर्षीप्रमाणे बाजी मारली असून १४ हजार ७४८ मुली तर १३ हजार ८०१ मुले परीक्षेत पास झाली आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
शाखानिहाय जिल्ह्याचा निकाल :
विज्ञान शाखा: ९८.५७ टक्के
कला शाखा: ८६.०३ टक्के
वाणिज्य शाखा: ९१.२९ टक्के
किमान कौशल्य शाखा: ८९.५९ टक्के
तंत्रविज्ञान: ९२.४० टक्के
तालुकानिहाय निकाल (टक्केमध्ये) :
पनवेल ९४.७३, उरण ९४.०३, कर्जत ९६.३१, खालापूर ८५.०२, सुधागड ८८.४४, पेण ९३.९४, अलिबाग ९५.३९, मुरूड ८८.४६, रोहा ९४.२९, माणगाव ९३.५१, तळा ९६.६९, श्रीवर्धन ९७.११, म्हसळा ९६.३१, महाड ९२.७३, पोलादपूर ८८.८४ टक्के.






