नवी मुंबई (प्रतिनिधी): खारघर येथील अरिहंत आलिशान संकुलात घडलेल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर अरिहंत डेव्हलपर्सचे संचालक अशोक छाजेड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा प्रकार पूर्वनियोजित षडयंत्र असून केवळ १५ ते २० जणांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा आरोप त्यांनी केला. पाण्याच्या समस्येवर चर्चा करण्याऐवजी कार्यक्रमात विघ्न आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
छाजेड यांच्या मते, त्या वेळी परदेशी पाहुण्यांसोबत महत्त्वाचे चर्चासत्र सुरू होते. त्यांनी रहिवाशांना संध्याकाळी भेटण्याचा निरोप दिला होता. मात्र काहींनी त्यांची तसेच परदेशी पाहुण्यांची वाहने अडविल्याने पाहुण्यांना रिक्षाने निघावे लागले. या प्रकारामुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पाणीपुरवठ्याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेची असून विकासक म्हणून नळजोडणी, एसटीपी, आरओ प्लांट तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रयत्न सुरू असल्याचे छाजेड यांनी स्पष्ट केले.






