अलिबाग (प्रतिनिधी) : पत्रकारांना कथित जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रायगड प्रेस क्लबने तीव्र निषेध व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर केले. या निवेदनात संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रायगड प्रेस क्लबच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पत्रकारांना धमकावणे, त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्यांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी रायगड प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी अध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, माजी उपाध्यक्ष प्रफुल्ल पवार, हर्षद कशाळकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे सचिव ॲड. राजेश भोस्तेकर, महेंद्र दुसार, प्रणय पाटील यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी एकमुखी भूमिका उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली.






