अलिबाग (प्रतिनिधी) : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अलिबाग तालुक्यातील फुफादेवी पाडा परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामस्थांच्या घरांजवळ मोठा धोका निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद अमितदादा नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
डोंगराळ भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे माती खचून दरड कोसळली. या दरडीसह आलेला एक भला मोठा दगड ग्रामस्थांच्या घरामागील संरक्षक पिचिंग भेदून थेट घराच्या कंपाऊंडमध्ये येऊन पडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी अमितदादा नाईक यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. दरडग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित विभागांनी भू-सुरक्षा उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाकडून त्वरित कार्यवाही करण्यात येईल आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन अमितदादा नाईक यांनी दिले.
या पाहणीवेळी ग्रामसेविका निशा चंदणकर, उपसरपंच संजय पाटील, सुशील पाटील, तुषार पाटील, रमाकांत पाटील, अनंत पाटील तसेच सविता चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत कर्मचारी संदीप काठे, प्रशांत कडवे आदी उपस्थित होते.
तसेच अमित नाईक यांनी तात्काळ अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील यांच्याशी फोन वर संपूर्ण घटनेची माहीती दिली .





