केतन अग्रवाल हत्याकांड : अँड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती; मुख्यमंत्री फडणवीसांचे तातडीने आदेश


मुंबई (प्रतिनिधी): पुण्यातील गाजत असलेल्या हायप्रोफाईल केतन अग्रवाल हत्याकांडात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या खटल्यात राज्याचे ज्येष्ठ विधिज्ञ आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अँड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खटल्याच्या सुनावणीला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मयत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी नुकतीच पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलाला न्याय मिळावा, तसेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी अग्रवाल कुटुंबाचे म्हणणे गांभीर्याने ऐकून तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश देत अँड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली. तसेच या खटल्याचा वेगाने निपटारा होण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याची आशा अधिक बळावली असून, या संवेदनशील आणि चर्चेतील प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता विशेष सरकारी वकील म्हणून अँड. उज्वल निकम न्यायालयात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडणार असून, या खटल्याच्या पुढील सुनावण्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.