अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सुनिल दशरथ थळे यांची अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
सुनिल थळे यांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ते रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, मापगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कायम संचालक, सुमती प्रगती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच सेवा शक्ती पतपेढीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी थळे यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानत जनतेसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.




