ग्रामीण विकासाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत वराळे येथे कोट्यवधींच्या कामांचा शुभारंभ


मावळ (श्रावणी कामत): मावळ तालुक्यातील वराळे गावात रविवारी विकासाचा नवा अध्याय सुरू झाला. ग्रामपंचायत वराळे, वॉर्ड क्रमांक २ येथे तब्बल १ कोटी ५५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. २०१९ नंतर गेल्या सहा वर्षांत गावात नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या कामांमुळे अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, पाणीपुरवठा, सभा मंडप, घंटागाडी, जिम साहित्य, स्ट्रीट लाईट आदी पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास साधण्यात आला आहे. विविध प्रकल्पांसाठी आतापर्यंत ७३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने गावाच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. या विकासामुळे नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असून, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा विकासप्रवास शक्य झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली ठाम बांधिलकी व्यक्त केली. प्रत्येक ग्रामपंचायतीला सक्षम करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणी सोडवणे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास श्री. विठ्ठल आण्णा शिंदे, गणेश भाऊ खांडगे, पल्लवीताई दाभाडे, साहेबराव कारके, मनोज भाऊ येवले, दिलीपभाऊ ढोरे, राजेंद्र कडलक, बबन दादा भोंगाडे, ज्ञानेश्वरजी मराठे, भरत भाऊ घोजगे, शहाजी अण्णा मराठे, बळीराम मराठे, बाळासाहेब दाभाडे, अनिता मराठे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “शब्द नव्हे… विकासाची ठोस कामगिरी” या उक्तीप्रमाणे वराळे गावात प्रत्यक्ष कामातून विकास साधला जात असून, आगामी काळातही अधिक वेगाने व प्रभावीपणे विकासकामे राबवली जाणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली