
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील सहाण बायपास परिसरात रविवारी दुपारी दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. मिनीडोर आणि इको कार यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रामराज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिराजी काष्टे यांच्या मालकीची इको कार (MH-06-CL-0414) या वाहनात सहा प्रवासी प्रवास करत होते. अपघातात सुरेश लागे या प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर प्रवाशांनाही किरकोळ मार लागल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे, खानाव येथील संतोष मगर यांच्या मिनीडोर (MH-06-S-3001) या वाहनात पाच प्रवासी होते. या वाहनातील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सर्व सुरक्षित असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






