
पनवेल (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे-कर्नाळा खिंड परिसरात रविवारी (३ मे) दुपारी भीषण अपघात घडला. साईकृपा हॉटेलसमोर भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलर अचानक पलटी झाल्याने एकच खळबळ उडाली. या वाहनातून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या २२ प्रवाशांपैकी १० जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित प्रवासी कौटुंबिक समारंभासाठी निघाले होते. कर्नाळा खिंडीतील वळणदार रस्ता आणि वाहनावरील अचानक सुटलेले नियंत्रण यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात इतका तीव्र होता की, वाहन पलटी होऊन रस्त्याच्या कडेला उलटले.
या अपघातात कुमार रुद्र म्हात्रे (८), रवींद्र माने (३७), प्रियांका माने (३०), वीणा माने (५६), नागेश कुणाल (६०), रूपा कोलारे (४४), जीत माने (३४), सदाशिव सोमणे (४२), सीता माने (५५) आणि स्नेहा माने हे जखमी झाले आहेत. सर्वांना हात, पाय, कंबर तसेच डोक्याला दुखापती झाल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पळस्पे-कर्नाळा खिंड परिसरातील मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक विश्वास पाटील यांनी तत्परता दाखवत सर्व जखमींना तातडीने नानासाहेब धर्माधिकारी हॉस्पिटल, पनवेल येथे दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे हलवण्यात आले.
वेळेत उपचार मिळाल्यामुळे सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.






