
अलिबाग (प्रतिनिधी): फुफादेवी पाडा येथे आज “फुफादेवीपाडा प्रिमियर लीग २०२६ – पर्व ४” अंतर्गत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. गावातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली.
या स्पर्धेला रायगड जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित सदस्य तसेच मुख्य प्रतोद मा. श्री. अमितदादा नाईक यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्रमुख उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये विशेष उत्साह संचारला. यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत सारळचे माजी उपसरपंच श्री. संजय मामा पाटील, माजी सदस्य श्री. चंद्रकांत मामा पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच गावातील ग्रामस्थ, महिला वर्ग आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला.
स्पर्धेत विविध संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे गावात क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली आहे. आयोजकांनी उत्तम नियोजन करून स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली, याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.






