शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार सुनील शेळके आक्रमक; पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश


मावळ (श्रावणी कामत): मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या पाणंद रस्त्यांच्या प्रश्नावर आमदार सुनील शेळके यांनी ठाम आणि कृतीशील भूमिका घेत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. वडगाव मावळ येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी तालुक्यातील विविध गावांतील पाणंद रस्त्यांची सद्यस्थिती, अतिक्रमणाचे प्रमाण तसेच नागरिकांच्या तक्रारींचा सखोल आढावा घेतला.
अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद पडलेले पाणंद रस्ते तात्काळ खुले करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष जागेवर जाऊन तोडगा काढण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीदरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे शेतीकामात येणाऱ्या अडचणी मांडल्या. यावर आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करत “नुसती चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृती” हा आपला कार्यमंत्र पुन्हा अधोरेखित केला.
या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी घरकुल योजनेचाही आढावा घेण्यात आला असून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक आणि परिणामकारक भूमिका घेत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. त्यांच्या या भूमिकेमुळे मावळ तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.