
अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री नियुक्त करण्यात आलेला नसल्याने प्रशासनिक कामकाजासह जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) स्थापनेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत माजी आमदार सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर नव्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र रायगड जिल्ह्यासाठी अद्याप पालकमंत्री जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांच्या समन्वयात अडथळे निर्माण होत असून विविध प्रशासकीय, सामाजिक व विकासकामांवर परिणाम होत असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
रायगड जिल्ह्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या असून नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील नवीन सदस्य निवडून आले आहेत. या नव्या प्रतिनिधींना जिल्हा नियोजन समितीत प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असतानाही पालकमंत्री नसल्याने DPC ची स्थापना रखडली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
जिल्हा नियोजन समिती स्थापन न झाल्याने निधी वाटप, विकास आराखडे आणि स्थानिक प्रश्नांच्या निवारणासाठी आवश्यक निर्णय प्रक्रियेलाही विलंब होत असल्याचे पत्रात म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांच्या प्रश्नांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे रायगड जिल्ह्यासाठी तातडीने पूर्णवेळ स्वतंत्र पालकमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी पंडितशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत पूर्वीप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची जिल्हा नियोजन समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी निवड करण्याचा सकारात्मक विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.






