नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबईतील पामबीच मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडल्याने या मार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यरात्री सानपाडा येथील मोराज चौकात झालेल्या अपघातात भरधाव वेगातील महागडी ‘डुकाटी’ दुचाकी एका कारवर जोरात आदळली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून कार चालकही जखमी झाला आहे. दोघांवरही जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक मोराज चौक परिसरात उजवीकडे वळत असताना वेगाने येणाऱ्या डुकाटी दुचाकीस्वाराला वाहनाचा अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव वेगातील दुचाकी थेट कारवर धडकली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले, तर डुकाटी दुचाकीचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात भरधाव वेग हे अपघाताचे मुख्य कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पामबीच रोडवरील वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी होणारे बेशिस्त वाहनचालक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि रेसिंगमुळे हा मार्ग अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ बनत चालल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करून या मार्गावरील अपघातांना आळा घालावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





