पोलादपुर पंचायत समिती अंतर्गत वाकण ग्रा.पं.ला सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत पुरस्कार प्रदान केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सातारा येथे गौरव


अलिबाग (प्रतिनिधी): जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्रामपंचायत हद्दीत महाआवास अभियान सन 2023-24 अंतर्गत बांधण्यात आलेल्या बहुमजली इमारतीला ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ या विभागातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार शुक्रवारी ता.15 सातारा येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी 30 लाख घरे मंजूर केली आहेत. त्यातील पाच लाख घरे पूर्ण झाली असून याचा लोकार्पण सोहळा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चैहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे ग्रामीण भागातील घरकुल योजनांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्यांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाआवास अभियान एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या अभियानांतर्गत पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्रामपंचायत हद्दीतील इमारतीला सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत या विभागातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देउन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे व वाकण ग्रामपंचायत सरपंच शांताराम जंगम आदी उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रुपाली सातपुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी अभिनंदन केले आहे.