रायगड पोलिस दलात नव्या K-9 कमांडो ‘बघीरा’ची एन्ट्री; स्फोटक शोध मोहिमांना मिळणार बळ


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड पोलिस दलाच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात नव्या K-9 कमांडोची भर पडली असून, ‘बघीरा’ या बेल्जियन मॅलिनॉइस जातीच्या श्वानाचा अधिकृत समावेश करण्यात आला आहे. रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, यापूर्वी कार्यरत असलेला ‘मॅक्स’ हा श्वान नियत वयोमानानुसार सेवामुक्त झाल्यानंतर त्याच्या जागी नव्या श्वानाची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेल्जियन मॅलिनॉइस ही जात अत्यंत बुद्धिमान, चपळ आणि सुरक्षा दलांमध्ये विशेष कामगिरीसाठी प्रसिद्ध मानली जाते. ‘बघीरा’ हे श्वान रायगड पोलिस दलात दाखल झाले तेव्हा त्याचे वय सुमारे नऊ आठवडे होते. या श्वानाचे नामकरण रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले.
‘बघीरा’ला भविष्यात स्फोटक पदार्थ शोधक (Explosive Detection Dog) तसेच स्निफर डॉग म्हणून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. प्राथमिक टप्प्यात त्याला रायगड-अलिबाग पोलिस मुख्यालयात पाच महिन्यांचे बेसिक ओबिडियन्स प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर पुढील सात महिन्यांमध्ये विशेष स्फोटक शोध प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
रायगड पोलिस दलातील श्वान पथकाने यापूर्वी विविध गुन्ह्यांची उकल, स्फोटक शोध मोहिमा तसेच विशेष बंदोबस्ताच्या कर्तव्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याच परंपरेत ‘बघीरा’ आधुनिक प्रशिक्षण घेऊन पोलिस दलासाठी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षे ‘बघीरा’ रायगड पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकात सेवा बजावणार आहे. नागरिकांची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला अधिक सक्षम करण्यासाठी रायगड पोलिस दल सातत्याने आधुनिक साधने आणि प्रशिक्षित पथके विकसित करत असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.