उमटे धरणातील गाळ काढण्याच्या मागणीला वेग; ‘धरण फुटेल’ अफवांना अभियंत्यांनी दिला पूर्णविराम


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्याच्या प्रश्नावर आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. “धरणातील गाळ काढला तर पाण्याच्या दाबामुळे धरण फुटेल,” अशी अफवा काही राजकीय नेत्यांकडून पसरवली जात होती. मात्र, रायगड जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांनी प्रत्यक्ष धरणस्थळी भेट देत या चर्चांना पूर्णविराम दिला.
उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडचे ॲड. राकेश नारायण पाटील यांच्या पुढाकारातून या प्रश्नाला गेल्या काही दिवसांत वेग आला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य अनंत गोंधळी यांच्या उपस्थितीत धरणावर पाहणी करण्यात आली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे, अलिबाग पंचायत समिती सदस्य संतोष निगडे तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीदरम्यान धरणातील गाळ काढण्याची गरज, वाढता पाणीसाठा आणि भविष्यातील पाणीटंचाई यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. “धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. शासनाबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष धरणावर येऊन पुढाकार घेणे, हे आमच्या संघर्षाचे यश आहे,” अशी भावना ॲड. राकेश पाटील यांनी व्यक्त केली.
तसेच, “धरणातील गाळ काढण्यासाठी शासनाकडे निधी नसल्याचे सांगितले जाते; मात्र धरणांच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, ही मोठी शोकांतिका आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, स्थानिकांच्या मते पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी प्रथमच प्रत्यक्ष धरणावर पाहणीसाठी आल्याने नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. उमटे धरणातील गाळ काढून पाणीसाठा वाढविणे आणि भविष्यातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.