रायगड (प्रतिनिधी): अलिबाग शहरातील सुजलाम नगर परिसरात राहणाऱ्या रायगड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद रामचंद्र सोनवणे (वय 53, रा. सुजलाम नगर, अनुप्रमा सोसायटी, सी विंग, रूम क्रमांक 4, तळमजला, ता. अलिबाग, जि. रायगड) यांनी 16 मे 2026 रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातील हॉलमध्ये छताला असलेल्या लोखंडी हुकाला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी मयत यांच्या पत्नी अश्विनी अरविंद सोनवणे (वय 47) यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात माहिती दिली. अरविंद सोनवणे हे रायगड पोलीस दलात पोलीस मुख्यालय अलिबाग येथे कार्यरत होते.
याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक 44/2026, बीएनएसएस कलम 194 प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार जे. एच. पाटील करीत आहेत.





