पीएनपी.एज्युकेशन आणि IEPS यांच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील तरुणांसाठी करिअरच्या दृष्टीने मोठी संधी उपलब्ध झाली असून पीएनपी.एज्युकेशन आणि IEPS यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये पहिल्यांदाच एअरपोर्टशी संबंधित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विमानतळ क्षेत्रातील विविध नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून १०० टक्के नोकरीची हमी देण्यात येत असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणामध्ये एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ, कस्टमर सर्व्हिस, तिकीट विभाग, कार्गो हँडलिंग, सुरक्षा विभाग, हॉस्पिटॅलिटी आदी क्षेत्रांबाबत व्यावसायिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असून मुलाखत तंत्र, व्यक्तिमत्त्व विकास आणि संवाद कौशल्यांवरही विशेष भर दिला जाणार आहे.
रायगडसारख्या ग्रामीण व निमशहरी भागातील युवक-युवतींना मोठ्या शहरांमध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्याची गरज भासू नये, यासाठी अलिबागमध्येच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही संधी खुली असून मर्यादित जागांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून एव्हिएशन क्षेत्रात करिअर घडवण्याचा मार्ग खुला होणार आहे. संस्थेने इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

***********

“अलिबाग, मुरुड, रोहा परिसरातील तरुणांनी एव्हिएशन आणि हॉस्पिटेलिटी क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा, यासाठी आयईएसपी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. बेरोजगारीवर कौशल्याधारित शिक्षण हाच उपाय असून, स्थानिक युवकांना रोजगाराशी जोडण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत,”

चित्रलेखा पाटील.
शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या तथा पी एन पी एज्युकेशन सोसायटी कार्यवाह.