अलिबाग (प्रतिनिधी): पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या महिलांचा छळ, अश्लील वर्तन आणि धमकी प्रकरणात अलिबाग न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे. मा. मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. बी. अत्तार यांच्या न्यायालयात दि. १८ मे रोजी ही सुनावणी झाली.
या प्रकरणातील आरोपी सुशांत दत्तात्रेय म्हात्रे (वय ३२, रा. रांजणखार, ता. अलिबाग) याला भारतीय दंड विधान कलम ३५४(अ) आणि ५०९ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने त्याला एक वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, तसेच दुसऱ्या कलमान्वये एक वर्ष साधी कैद व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कैदेची तरतूदही करण्यात आली आहे.
प्रकरणातील माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या घरात जाऊन अश्लील मजकूर असलेल्या चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. तसेच फिर्यादीच्या मुलीसमोर आणि इतर महिलांसमोर अश्लील कृत्य करून त्यांना धमक्या दिल्या होत्या. यानंतर पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी एस. एस. शिंदे यांनी केला. सरकारी वकील प्रसाद पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली.






