रायगडच्या सत्ताकारणात मोठा ट्विस्ट?


पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची चर्चा; महायुतीतील अंतर्गत तणाव वाढला

रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत असून, जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत नवी राजकीय समीकरणे आकार घेत असल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांना राजकीय धक्का बसणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.राज्यात येत्या काळात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी रायगड-रत्नागिरी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादीला देण्यास रायगडमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून विरोध होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा म्हणून रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, रायगड-रत्नागिरी विधान परिषद मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री स्तरावर प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, पक्षांतर्गत बदलत्या राजकीय समीकरणांमुळे अदिती तटकरे यांच्या राजकीय प्रभावावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गेल्या काही वर्षांत रायगड जिल्हा हा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्षाचे प्रमुख केंद्र ठरला आहे. विशेषतः शिंदे गट आणि तटकरे गटातील राजकीय संघर्षामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला. महायुती सरकारमध्येच नव्हे, तर महाविकास आघाडीच्या काळातही रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण झाले होते.आता आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत नव्याने राजकीय समतोल साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद अखेर शिवसेनेकडे जाते का, याकडे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.