अलिबाग (प्रतिनिधी): महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या १३४ व्या स्थापना दिनानिमित्त वाडगाव (ता. अलिबाग) येथे उपसरपंच जयेंद भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पशुधन आरोग्य व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. पशुसंवर्धन विभाग, रायगड आणि जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात पशुपालकांना विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिरामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी आणि इतर पशुधनासाठी जंतनाशक मात्रा तसेच विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. घटसर्प, पीपीआर, फऱ्या, रेबीज आणि कुक्कुटवर्गीय लसीकरणाचाही त्यात समावेश होता. याशिवाय जनावरांमधील वंध्यत्व, गर्भधारणेशी संबंधित समस्या आणि इतर आरोग्यविषयक अडचणींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकरी आणि पशुपालकांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, गोठा अनुदान आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या योजनांबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास वाडगाव ग्रामपंचायत सरपंच सारिका गणेश पवार, उपसरपंच जयेंद्र भगत, सदस्य सरिता भगत, रुपाली पाटील, माजी सरपंच सीताराम भगत, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. अजय कांबळे, डॉ. पी. एम. क्षीरसागर, डॉ. प्रियंका मेकडे, ग्राम अधिकारी रीना वर्तक, पोलीस पाटील नथुराम म्हात्रे, रमेश भगत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
पशुधनाचे आरोग्य सुधारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा उद्देश या शिबिरामागे असल्याचे प्रशासनाने सांगितले.






