अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड की कारचा चक्काचूर; एक जण गंभीर जखमी
भरधाव वेग जीवावर बेतला; कामशेतजवळ पुण्यातील २ ज्येष्ठ नागरिक दगावले
देवदूत पथक, पोलिसांची युद्धपातळीवर मदत; ‘एक्स्प्रेस’वरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मावळ (प्रतिनिधी): मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा एकदा वेगाने धावणाऱ्या वाहनाने जीव घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कामशेतजवळ भरधाव स्कोडा कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच अंत झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, रस्त्याच्या मधील लोखंडी दुभाजकाचा जाड पत्रा तुटून थेट कारच्या आरपार गेल्याने घटनास्थळाचे भयाण दृश्य होते. बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बौर गावच्या हद्दीत हा थरारक अपघात घडला. जयदीप गोडे वय ६१ वर्ष आणि किशन उत्तम चंदाने वय ७५ वर्ष दोघेही राहणार उंडरी, पुणे यांचा या दुर्घटनेत जागीच अंत झाला. तर संजय मेवाला वय ६१ वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच वडगाव महामार्गाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, कामशेत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. देवदूत आपत्कालीन पथक आणि डेल्टा फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबवत कारमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढले. गंभीर जखमी संजय मेवाला यांना तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले आणि काही वेळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.






