अलिबाग शहरात नालेसफाईला जोरदार सुरुवात


अलिबाग (प्रतिनिधी): पावसाळा तोंडावर येत असताना अलिबाग शहरात नालेसफाईच्या कामांना जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि झाडाझुडपांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अलिबाग शहरातील प्रमुख नाले, गटारे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांची साफसफाई करण्यात येत आहे. शहरातील सखल भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याने यंदा कोणतीही जोखीम न घेता कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत शहरातील विविध भागांमध्ये नालेसफाईची कामे सुरू केली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, नागरिकांना त्रास होऊ नये तसेच शहरातील वाहतूक आणि जनजीवन सुरळीत राहावे यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी देखील शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, नाल्यांमध्ये कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या नालेसफाईमुळे आगामी पावसाळ्यात अलिबागकरांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.