अलिबाग तालुक्यातील सकल मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात गुणगौरव
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील सकल मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी कुरूळ येथील सुरुची रिसॉर्टमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकल मराठा समाज अलिबाग आणि युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था, चोंढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक जाणीव, संस्कार आणि आध्यात्मिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा सोहळा ठरला.
कार्यक्रमाला समाजातील विविध मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सकल मराठा समाजाचे संघटक प्रसाद सुप्रिया सुधीर गायकवाड (पिंट्या) यांनी समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. “विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते समाजाचे भविष्य घडवू शकतात. त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत,” असे त्यांनी नमूद केले.
संतोष राऊत यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत चांगले संस्कार, नैतिकता आणि आध्यात्मिक मूल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ शैक्षणिक यश नव्हे, तर चांगला माणूस घडणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात जय भवानी पतसंस्थेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “ध्येय निश्चित करून कठीण परिस्थितीतही जिद्दीने आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहिल्यास यश निश्चित मिळते,” असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, प्रेरणा आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमास डॉ. शेटे, पत्रकार उमाजी केळुस्कर, मिलिंद चव्हाण, दिलेंद्र शिलदणकर, संतोष पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.






