अलिबाग (प्रतिनिधी): काशीद समुद्र किनारी समुद्राच्या तीव्र पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन बुडण्याच्या स्थितीत असलेल्या पती-पत्नीचे प्राण धाडस, तत्परता आणि कौशल्याच्या जोरावर वाचविणाऱ्या रायगड पोलीस दलातील दोन पोलीस अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक रायगड आँचल दलाल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
काशीद समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेले पती-पत्नी समुद्राच्या पाण्यात उतरले असता अचानक आलेल्या जोरदार प्रवाहामुळे ते खोल पाण्याकडे वाहून जाऊ लागले. काही क्षणांतच परिस्थिती गंभीर बनली असून दोघेही बुडण्याच्या अवस्थेत पोहोचले होते. यावेळी किनाऱ्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या रायगड पोलीस दलातील दोन्ही पोलीस अंमलदारांनी प्रसंगावधान राखत कोणतीही जीवाची पर्वा न करता तातडीने समुद्रात धाव घेतली.
अत्यंत धोकादायक परिस्थितीत आणि समुद्राच्या वेगवान लाटांचा सामना करत त्यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या शौर्यपूर्ण आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या कार्यामुळे संबंधित दाम्पत्याचे प्राण वाचले असून उपस्थित पर्यटकांनीही पोलिसांच्या या धाडसाचे कौतुक केले.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मा. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी संबंधित पोलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सदैव तत्पर असून अशा धाडसी कर्मचाऱ्यांमुळे रायगड पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Home ताज्या बातम्या काशीद समुद्र किनारी बुडणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी दिले जीवदान रायगड पोलीस दलातील दोन...






